ad-banner

चोरी

चोरी

“सर, ओळखलंत मला? मी विश्वास,तुमचा विद्यार्थी, ४० वर्षांपूर्वीचा.”
“नाही रे, नीट दिसत नाही आजकाल आणि स्मृतीही दगा देऊ लागली आहे. बरं ते जाऊ दे, तू बोल, काय करतोस आजकाल ?”
“सर, मी पण तुमच्या सारखाच शिक्षक झालोय.”
“अरे वा, हो का? पण काय रे, शिक्षकांचे पगार एवढे कमी, तुला का रे वाटलं शिक्षक व्हावंसं ?”
” सर, तुम्हाला मी आठवेन बघा. मी सातवीत असतांना आपल्या वर्गात एक घटना घडली होती आणि मला तुम्ही त्यातून वाचवलं होतं. खरं तर तेव्हाच मी ठरवलं होतं कि तुमच्या सारखंच शिक्षक व्हायचं.
“असं काय बरं झालं होतं तेंव्हा वर्गात?”
“सर, आपल्या वर्गात एक अक्षय नावाचा श्रीमंत मुलगा होता. एक दिवस तो हाताचं घड्याळ लावून आला. आमच्या कुणाकडेच तेव्हा घड्याळ नव्हतं. ते घड्याळ चोरायची माझी इच्छा झाली. आणि खेळाच्या तासाला जेव्हा मी पाहिलं कि त्याने घड्याळ कंपास पेटीत काढून ठेवलंय, मी योग्य संधी साधून ते माझ्या खिशात घातलं. पुढचा तास तुमचा होता. तुम्ही वर्गात येताच अक्षयने तुमच्या जवळ घड्याळ चोरीची तक्रार केली. तुम्ही आधी वर्गाचं दार आतून लावून घेतलंत. म्हणालात,” ज्याने कोणी घड्याळ घेतले असेल, त्याने ते परत करावे, मी शिक्षा करणार नाही.”
माझी हिम्मत होईना कारण मी ते परत केले असते तर आयुष्यभर माझी सर्वांनी “चोर” म्हणून हेटाळणी केली असती.
पुढे तुम्ही म्हणालात,” उभे रहा सारे एका लाइनीत आणि बंद करा आपले डोळे. मी सर्वांचे खिसे तपासणार आहे. मात्र सर्वांचे खिसे तपासणे होईपर्यन्त कुणीही डोळे उघडायचे नाहीत.”
तुम्ही एक एक करत सर्वांचे खिसे तपासत माझ्या जवळ आलात, माझी छाती धडधडत होती. तुम्ही माझ्या खिशातून ते घड्याळ काढलंत पण तरीही उरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खिसे तपासलेत आणि ते झाल्यावर आम्हाला डोळे उघडायला सांगितलं. तुम्ही अक्षयला ते घड्याळ देऊन म्हणालात,” बाळा,पुन्हा घड्याळ घालून वर्गात येऊ नकोस आणि ज्याने कोणी ते घेतलं होतं, त्यानं असं गैरकृत्य पुन्हा करायचं नाही ” आणि नेहमी प्रमाणे तुम्ही शिकवायला सुरुवात केलीत.
तेव्हाच काय पण पुढे मी शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन शाळा सोडली तरी तुम्ही माझ्या चोरीची ना कधी वाच्यता केली, ना कधी मला ते दर्शवलंत. सर, आजही माझे डोळे पाणावले ते आठवून. सर, मी तेव्हाच ठरवलं होतं की मी पण तुमच्याच सारखा शिक्षक होणार आणि मी झालोही. ”
“अरे, हो, हो, मला आठवते आहे ती घटना. पण मला या घटकेपर्यंत माहीत नव्हतं कि ते घड्याळ मी तुझ्या खिशातून काढलं होतं, कारण….
कारण तुमचे खिसे तपासून होईपर्यंत मी पण आपले डोळे बंद ठेवले होते.”
(आधारित)

Rating Star

0 comment

Leave a comment


Related news

side-banner
side-banner

RECENT COMMENTS