ad-banner
Blog Details
Home / महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मु / कोरोना संकट आणि शाळा सुरू करण्याचा अट्टाहास.

कोरोना संकट आणि शाळा सुरू करण्याचा अट्टाहास.

कोरोना संकट आणि शाळा सुरू करण्याचा अट्टाहास.

मार्च महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणू ने धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीला देशात १०-२० असणारी रुग्ण संख्या आता काही लाखांवर पोचली आहे.  मा.मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे सर यांच्या उत्तम नेतृत्वाखाली राज्य शासन कोरोना शी लढा देत आदर्श कामगिरी बजावत आहे. या आणिबाणीच्या काळात उद्धवजी ठाकरे सरांसारखे आदर्श, तडफदार, लढवय्या, दूरदर्शी आणि संयमी नेतृत्व मिळाले हे सर्व महाराष्ट्राचे सुभाग्यच म्हणावे लागेल. अनेक धाडसी पण आवश्यक निर्णय उद्धवजींनी या कोरोना संक्रमण काळात घेतले आहेत, ते सर्व निर्णय अर्थातच संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजवर फायदेशीरच ठरले आहेत. 
 
आत्तापर्यंत ४ लॉकडाऊनला महाराष्ट्रीयन जनता सामोरी गेली आहे.  ५ व्या लॉकडाऊन ची सुरुवात झालेली आहे. मुळात हा ५ वा लॉकडाऊन म्हणजे अनलॉकडाऊन आहे, असेही म्हणता येईल. अनेक सोई सुविधा, कार्यालय पुढील काळात सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. शासनाची भूमिका अगदी रास्त आहे. कोरोना सोबत जगायची तयारी आपण सर्वांनी करायला हवी, यासाठी शासनाची ही धडपड सुरू आहे. 
 
आज माननीय उद्धवजी ठाकरे सर यांनी १५जून पासून शाळा सुरू करण्याचा मानस जाहीर केला. ज्या ज्या ठिकाणी शक्य त्या त्या ठिकाणी शाळा सुरू करणार आणि जेथे शक्य नाही तेथे ऑनलाईन शिक्षण सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला असावा. परंतु शैक्षणिक नुकसान नंतर भरून काढता येईल पण जर शाळेत येताना - जाताना जर त्या विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यात जर त्याचे काही बरेवाईट झाल्यास, कोणालाही याची भरपाई करता येणार नाही.
 
आज संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीने ग्रासलेला आहे. महाराष्ट्रातही याचे गंभीर पडसाद आपणास पहावयास मिळत आहेत. लहान मुले आणि वयोवृध्द व्यक्तींना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा जास्त धोका असल्याचे म्हटले जाते. अश्या वातावरणात शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे जीवनाशी खेळ केला जातोय असे वाटत नाही का?

 

शाळा सुरूच करू नका, असे कोणाचेही म्हणणे नाही. "शाळा सुरू करायला हवीच, पण योग्य वेळी." लॉकडाऊन ५.०  हा ३० जून पर्यंत घोषित करण्यात आला आहे. इतर कार्यालय, दुकाने, काही सोई सुविधा या अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या आहेत. सर्वात आधी हा ५ वा लॉक डाऊन संपेपर्यंत संयम ठेवावा, या काळात कार्यालय, दुकाने उघडून ही कोरोना संसर्ग वाढतोय की कमी होतोय यावर लक्ष ठेवावे. निरिक्षणासाठी एखादी कमिटी नेमता आली तर उत्तमच. ३० जून नंतर ५ व्या लॉक डाऊन चा सूक्ष्म अभ्यास करूनच जुलै महिन्यात शाळा सुरू करावी की नाही यावर योग्य तो निर्णय घेण्यात यावा. जुलै महिन्यात ऑनलाईन शिक्षण सुरू करून ऑगस्ट महिन्यात परिस्थिती योग्य असल्यास प्रत्यक्ष शाळा सुरू करून अध्ययन- अध्यापन प्रक्रिया सुरू करावी.

 
मार्च महिन्यात २०तारखेनंतर विद्यार्थ्यांना शाळेला  सुट्टी जाहीर झाली.पण लगेच एप्रिल महिन्यात ऑनलाईन शिक्षण शाळांनी सुरू केले. ऑनलाईन शिक्षकांनी दिलेला अभ्यास त्यांना ऑफलाईन करावा लागत आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे मे महिन्याची सुट्टीतही मिळालेला अभ्यास. मे महिना म्हणजे विद्यार्थ्यांची हक्कांची सुट्टी.पण त्या सुट्टीला सुद्धा विद्यार्थी मुकले आहेत. अशा विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून १ जून ते ३० जून पर्यंत ऑनलाईन शिक्षणापासून सुट्टी जाहीर करावी. ऑनलाईन आणि ऑफलाईन असे कोणतेही अध्ययन - अध्यापन नको. विद्यार्थ्यांनाही पुढील शैक्षणिक वर्षाची मानसिक आणि शारीरिक तयारी करण्यासाठी मानसिक आराम देणे आवश्यक आहे.
 
१५ - ३० दिवस शाळा जरी उशिरा सुरू झाल्या तरी एप्रिल महिन्यात शाळा सुरू ठेवून, सुट्ट्या कमी करून, अभ्यासक्रम कमी करून, परीक्षा थोड्या उशिरा घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येणे शक्य आहे. सध्या विद्यार्थ्यांचे जीव जास्त महत्त्वाचा आहे. शिक्षण तर निरंतर पुढे सुरू राहणारच आहे.
 
आजचा विद्यार्थी हा देशाचा भावी नागरिक असतो. त्यामुळे भविष्यात जर देश वाचवायचा असेल, तर आज आधी विद्यार्थी वाचवायला पाहिजे. जीवनात शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहेच, पण सर्वात आधी जीवन त्याहूनही जास्त महत्वाचे आहे. म्हणूनच शासनाने आधी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करावा मगच शाळा सुरू कराव्यात की नाही याबाबत विचार करून जुलै महिन्यात निर्णय घ्यावा. त्याचबरोबर जवळपास एप्रिल महिन्यापासून सुरू असलेल्या ऑनलाईन अध्ययन अध्यापनापासून सर्व विद्यार्थ्यांना मानसिक आराम म्हणून ऑनलाईन शिक्षणापासून ३० जूनपर्यंत सुट्टी मिळावी. तसेच जुलै महिन्यात फक्त ऑनलाईन शिक्षण सुरू करून प्रत्यक्ष शाळा मात्र ऑगस्ट महिन्यातच उघडाव्यात, याबाबत मा.मुख्यमंत्री आणि मा.शिक्षणमंत्री याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतील, ही अपेक्षा ! 

श्री. तानाजी कांबळे
मुंबई जिल्हाध्यक्ष
८४२२९६३१२३, ९८२१७६२८४३
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई
        

Rating Star

0 comment

Leave a comment


Related news

side-banner
side-banner

RECENT COMMENTS