ad-banner
Blog Details
Home / यशस्वी व्यक्तिमत्व / प्रारब्धाच्या रणसंग्रामात निकराने आयुष्याची लढाई लढत यशाचा गड खेचूनआणणारा योद्धा ' ... एक भारावून टाकणारं व्यक्तिमत्व ..... तानाजी कांबळे

प्रारब्धाच्या रणसंग्रामात निकराने आयुष्याची लढाई लढत यशाचा गड खेचूनआणणारा योद्धा ' ... एक भारावून टाकणारं व्यक्तिमत्व ..... तानाजी कांबळे

प्रारब्धाच्या रणसंग्रामात निकराने आयुष्याची लढाई लढत यशाचा गड खेचूनआणणारा योद्धा ' ... एक भारावून टाकणारं व्यक्तिमत्व ..... तानाजी कांबळे

नेहमीच्या चहाच्या कट्ट्यावर सुटीच्या दिवशी पाचसहा मित्रांची मैफिल जमली होती... बदल्यांच्या संदर्भात कसलीतरी पोस्ट पडल्याने आपापले 'डिजिटल संजय' अर्थात 'इस्मार्ट फोन' काढून तंत्रज्ञानाने आंधळे झालेलो आम्ही 'धृतराष्ट्र'..!  ग्रुपवर तो मेसेज धुंडाळण्यात व्यग्र झालो...
 
अचानक एक मध्यमा, तर्जनी अन अंगठा तुटलेला.... करंगळी अन अनामिका उडवत हात डोळ्याच्या अन मोबाईलच्या मधोमध आला... मी ताडकन वर पाहिले तर हाताची फक्त तीन बोटे नसलेला पण धडधाकट तरुण केविलवाणा चेहरा करून भीक मागत होता...!
 
प्रचंड राग आला.. 'चल निघ..!' अशा शब्दात त्याला मी हाकलले..! 
 
एका मित्राने मात्र त्याला चहा पाजला अन त्याने माझ्याकडे मोर्चा वळवला.. 'भाऊ, बिचारा अपंग आहे.. अन तुम्ही तर कनवाळू आहात मग आज याला का हाकलले.. मला समजले नाही, भाऊ !' 'कारण माझा लहान भाऊ वयाच्या सोळाव्या वर्षी 'बोनकॅन्सर' मुळे कंबरेपासून उजवा पाय गमावून अपंग आहे अन तोच भाऊ आज स्वबळावर सुरू केलेल्या व्यवसायाच्या जीवावर माझ्या एकत्र कुटुंबाचा भक्कम आधार आहे !'
 
मी थोडा उद्विघन होऊन बोललो. क्षणभर शांतता पसरली...! 'भाऊ, अगदी खरंय भीक मागणे आजच्या युगात सर्वात 'बेस्ट' धंदा झालाय, त्याची तीन बोटे काय गेली, लागला भीक मागायला... पण एखादे आपल्या लायकीचे काम बघून करणे अशा लोकांच्या जीवावर का येते ?' 
 
माझे समर्थन करत एक मित्र बोलले ! 'भाऊ तो थोडासा शारीरिक अन प्रचंड मानसिक अपंग आहे..! सोडा त्याचा विषय....यापुढे मी सुद्धा असल्याची गय करणार नाही..!' त्याला चहा पाजलेला माझा मित्र बोलला. 
 
'आपल्या शिक्षण क्षेत्रात सुद्धा अनेक अपंग बांधव धडधाकट बांधवापेक्षा उत्कृष्ट काम करताहेत ! अरे.. 'जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्यसरचिटणीस' गोविंद उगले यांनी मला एका व्यक्तित्वाबद्दल सांगितले त्याच्याबद्दल ते बोलतांना थकत नव्हते... अन मी ऐकतांना ! मी तर दंगच झालो !
 
अत्यंत प्रेरणादायी अन जगण्याचे कौशल्य शिकवणारे व्यक्तिमत्व ! अप्रतिमच !! त्या व्यक्तीला ऐकल्यावर आपणच अपंग आहोत की काय याची भावना अनेकवेळा माझ्या मनात निर्माण झाली !!'
 
मी. 'कोण आहे भाऊ तो ?'
 
मित्राने चहावाल्याला हातानेच चहा देण्याचा इशारा केला अन मी बोलता झालो !
 
'महाराष्ट्र जुनी पेंशन हक्क संघटन मुंबई चा जिल्हाध्यक्ष ''तानाजी राजाबाई कांबळे'' !'
 
'जन्मताच काही लोक तोंडात सोन्याचा चमचा घेऊन येतात तर काही जन्मतातच खडतर जीवनाची परीक्षा देण्यासाठी..! अन त्यापैकी एक म्हणजे 'तानाजी' !!
 
अठराविश्व दारिद्र्य ओटीत मिळालेले अन जन्म झाला म्हणून जगायचे, पोटाची खळगी भरायची म्हणून राबायचे, आई-बापांनी जग दाखवले म्हणून जगायचे त्याच आई-बापांनी लग्न लावून दिले म्हणून संसार करायचा असा एकाच जन्मात अनेक जन्मांचा प्रवास केलेल्या क्षणोक्षणी दोन्ही 'सावित्री' पेक्षा कठोर सत्त्वपरीक्षा दिलेल्या 'मातेच्या' पोटी तानाजीचा जन्म झाला..!
 
तिसरे अपत्य म्हणून.... त्याच्या जन्माने मात्र रेशन दुकानावर धान्य आल्यावर जेवढा आनंद होतो फक्त तेवढाच आनंद तिला 'तानाजी' झाल्यावर झाला...! पण बापाला आनंदाचे कारणच हवे असल्याने तो 'देशीच्या' पुरात वाहून गेला..!प्रचंड गरिबी, मजुरीचा वानवा अन क्षणोक्षणी चणचण, उपासमार असल्याने कांबळे कुटुंबाने तीन लेकरांसह रोजंदारीची हमी देणाऱ्या मुंबई शहरात स्थलांतराचा निर्णय घेतला... तीन कोवळे लेकरं पाठीशी घेऊन मायमाऊली लेकरांच्या भवितव्यासाठी निघाली... मनात रुपेरी स्वप्न... पण राहायचा ठिकाणा नाही का रोजंदारीची खात्री नाही अन त्यात प्रारब्ध असे की पदरात व्यसनी नवरा..!
 
मुंबईत पोहचल्यावर तानाजीच्या मामांनी साथ दिली... हाताला काम मिळाले.. अतिक्रमण करून एक जागा पकडली.. कुटुंबाला छत मिळाले... सुख दारात येऊ पाहताच नियतीने पुन्हा घात केला.
 
वयाच्या पाचव्या वर्षी तानाजी तापाने फनफनला .. पोलिओ बद्दल त्यावेळी मुंबईत (स्लॅम एरिया) मध्ये जास्त जनजागृती नव्हती..एक बोगस डॉक्टरने विचार न करता तापत असलेल्या तानाजीचा ताप कमी करण्याऐवजी त्याला तापेत इंजेक्शन देऊन आपल्या बोगस इन्फेक्शनने चालत्या फिरत्या तानाजीला अधू करून टाकले.. तोच आजार एवढा वाढला की महाराष्ट्राच्या राजधानीतील कोणताच डॉक्टर तानाजीच्या जगण्याची हमी घेईना..!
 
पण आईच ती... जन्मताच सत्वपरिक्षेची परीक्षार्थी म्हणून जन्म घेतल्याने तिने 'तानाजी' विषयाचा जेजे हॉस्पिटल ते हाजी अली दर्गा याचे अंतर पार करत अन त्याचे दोन दोन ऑपरेशन करण्यासाठी केलेले प्रयत्न, अनेक नवस, ज्याने ज्या मंदिर, दर्गा कडे बोट दाखवले त्याच्या उंबऱ्यावर माथा टेकत, प्रचंड कष्टाचे केलेले काम अन विधात्याकडे केलेली करून याचना याचा पेपर इतक्या आत्मीयतेने सोडवला की 'भाग्यविधात्या' परिक्षकाला लाज वाटली अन तानाजी 'ढकलपास' का होईना पण पास झाला... त्याचा जीव वाचला !!....  पण त्याचे दोन्ही पाय अधू झाले ! मात्र समाज 'लुळा-पांगळा' अन सरकार '८०% अपंग' असल्याचे प्रमाणपत्र त्याच्या हाती ठेवून त्याचा गौरव (?) करण्यास विसरला नाही !!

कुटुंबावर आलेले हे संकट कमी होते की काय त्यात.... व्यसनी बापाने आईच्या पदरात तीन लेकरं टाकून रातोरात पलायन केले, आपली चूल स्वतंत्र मांडली अन सर्वांना अनाथ करून गेला....!  धुणे, भांडी घरकाम किंवा हाताला मिळेल ते काम करून आई आपल्या तिन्ही लेकरांच्या उज्वल भविष्यासाठी रात्रंदिवस मरमर करत होती.
 
तानाजीला तब्बल आठवी इयत्तेपर्यंत आपल्या कडेवर बसवून शाळेत सोडत असे ! नववीत गेल्यावर कुठे त्याला 'कॅलिपर' उपलब्ध झाले अन त्याच्या सहाय्याने तो स्वतःच्या पायावर शाळेत जाऊ लागला, २००३ साली १० वी मध्ये असतांना तो शाळेतून द्वितीय क्रमांकाने पास झाला. त्यांच्यावरील अभिनंदनाच्या वर्षावाने 'आपल्या कष्टाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले!' अशा भावनेसह आईंनी आपल्या आनंदअश्रूंना वाट मोकळी करून दिली. आज ती त्याला आशीर्वाद शिवाय काहीच देऊ शकत नव्हती कारण एकच ! पदराची माया न सोडणारे दारिद्र्य ! मनात प्रचंड इच्छा असून एखादा पेढा ती त्याला भरवू शकत नव्हती म्हणून तिने चमचाभर साखर तानाजीच्या मुखी भरवून त्याची समज काढली अन एकांतात जाऊन खूप रडली..!

१२ पर्यंतचे शिक्षण RJ कॉलेज घाटकोपर येथे पूर्ण केल्यानंतर केवळ आर्थिक परिस्थितीमुळे एक सामाजिक भान जपणारे डॉ. मोरारजी माव यांच्याकडे तानाजी कंपाउंडर म्हणून काम करू लागला... याच्या घरचा एकंदर विचार करता या डॉक्टर मधील सज्जन माणसाने त्याला डी. एड. चा मार्ग दाखवून, त्याला मार्गदर्शन करत, फॉर्म आणून तो भरून त्याच्या प्रवासाचा खर्च केला.
 
तानाजीचा जेंव्हा डी. एड. ला नंबर लागला तेंव्हा आईने जिथे काम करते त्या लोकांकडून काही कर्जाऊ रक्कम घेतली अन तानाजीचा प्रवेश सुकर झाला.समाजातील एक देवमाणूस त्याला भेटल्याने तो आज शिक्षक आहे. आपण सचोटीने, कष्टाने व प्रामाणिकपणे काम केले तर देव सुद्धा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गे मदत करतोच याची पुन्हा एकदा प्रचिती आली..!
 
भांडुपच्या  डोंगरमाथ्यावर असलेले एक डी. एड. कॉलेज मध्ये तानाजीला प्रवेश मिळाला, दररोज रिक्षा करून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. अन रिक्षाभाडे पेलवेल एवढी आर्थिक परिस्थिती सुद्धा नव्हती ! एक सद्गृहस्थ जे की प्रशासनात काम करत होते त्यांना दया आली अन त्यांनी डोंगरमाथ्यावर असलेले अध्यापक विद्यालय बदलून देत नव्यानेच सुरू झालेल्या 'नवजीवन अध्यापक विद्यालय भांडुप' मधील विद्यालयात त्याची रवानगी केली, पण इथेही त्याच्या वाट्याला अव्हेलनाच ! विद्यालय ५व्या माळ्यावर होते. 
 
'नव्यानेच विद्यालय सुरू झाले अन पहिलाच प्रवेश घ्यायला 'लंगडा-पांगळा' विद्यार्थी ! जा बाबा एखादे दुसरे विद्यालय पहा..! घाटकोपर ते भांडुप प्रवास करत तू येणार अन इमारतीचे ५ मजले चढून वर येणार यात कसली दुर्घटना झाली तुझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण? आम्हाला पापाचे धनी करू नको, तुला आम्ही प्रवेश देऊ शकत नाही !'
 
तो निराश झाला खरा पण खचला नाही. पावलोपावली ज्याने जन्मापासून संघर्ष केलाय जीवनात अनेक लढाया लढून जिंकलाय तो तानाजी हरेलच कसा ?? आयुष्यातले पाहिले धरणे आंदोलन त्याने प्रचार्यांच्या केबिनसमोर धरले. दोन-चार तासाच्या त्याच्या या आंदोलनाने व त्याने जी आपली जिद्द दाखवली. त्यापुढे कॉलेज प्रशासन नरमले. मध्यस्थाने एक मार्ग काढला. 'माझे शिक्षण चालू असतांना प्रवासात किंवा सदरील महाविद्यालयात येतांना, चढउतार करतांना जर माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाले तर त्यास सर्वस्वी जबाबदार मी स्वतः राहीन!' अशा आशयाचा एक अर्ज प्रचार्यांच्या समोर सादर केल्यावर त्याला प्रवेश मिळाला! एकप्रकारे त्याने आपले मृत्यूपत्रच प्रचार्यांच्या स्वाधीन केले होते ..!!
 
प्रचंड ऊर्जेने अध्ययन करत त्याने जेंव्हा शिक्षणशास्त्र पदविका चे शिक्षण पूर्ण केले, उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून त्याचा सत्कार करण्यात आला तेंव्हा तेच प्राचार्य भारावले, 'तानाजी .. आज खऱ्या अर्थाने तू माझे डोळे उघडलेस, माणसाकडे माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आज तू मला दिलास ! माझी नीती बदलवलीस अन तुझ्या सचोटीने, मेहनतीने माझ्या डोळ्यात जे अंजन घातलंय त्यामुळे माझा माझ्याकडे माझ्या कुटुंबाकडे व जगाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदललाय ! धन्यवाद तानाजी !!' प्रवेश नाकारणारे प्राध्यापक डोळे पुसत होते !! 
 
शिक्षण झाले...CET दिली... पण एक संधी चालून आली अन तानाजी कांदिवली येथे 'पायोनियर पब्लिक स्कुल' येथे २००८ मध्ये नौकारीला लागला, नौकरीबरोबर त्याला 'अंशदायी पेंशन योजना' भेट मिळाली ! नौकारीला लागल्या बरोबर त्याने आईंचे बाहेरील सर्व कामे बंद केली...!
 
अगदी बेरोजगार असतांना व शिक्षणसेवक म्हणून जेंव्हा तानाजी नौकारीला लागला तेंव्हा त्याला आर्थिक, मानसिक आधार देत 'बापभाऊ' बनलेल्या धनाजीने तानाजीला कधीच एकटेपणाची जाणीव होऊ दिली नाही ! त्याच्यासाठी तो आजही 'बापमाणुस' आहे ..!

नौकारीचा पहिला पगार.... अन..
'चंदनापरी झिजलीस आई तू..... !'
'आता तुजसाठी मी झिजावे.....!'
'उपाशी पोटी अंगाई गायिलीस तू....!'
'आता तुझ्या कष्टाचे गीत मी गावे....!'
 
तानाजीच्या आईचा आदर्श अन तानाजीच्या मातृभक्तीचा आदर्श घ्यावा असे तो प्रसंग होता.. आई त्याचे अन तो आईचे डोळे पुसत होता...! घराला घरपण देत, भावंडांना आधार देत तानाजी आपल्या संसारात व्यग्र झाला. 'जुनी पेंशन हक्क संघटन' नेमकेच बाळसे धरू पहात असतांना राज्य सल्लागार श्री. दुबे सर यांच्या सल्ल्याने त्याने राजधानी शहर असलेल्या मुंबापुरीत प्रथम 'जुनी पेंशन हक्क संघटन' ची शाखा स्थापन केली !
 
सुरुवातीला मोजक्या साथीदारांसोबत शासनाशी लढा दिला, एकास-दोन, दोनास-तीन अशी संख्या वाढत गेली, नव्यानेच व्हाट्सअप्प आल्याने एक ग्रुप स्थापन करून तानाजीने संघटनेला एक भक्कम विचारमंच प्राप्त करून दिला, संघटनेच्या प्रश्नांसाठी मंत्रालयात चकरा वाढू लागल्या, स्वतः अपंग असतांना सुद्धा प्रचंड ऊर्जेने काम करणाऱ्या या मुंबईच्या प्रथम जिल्हाध्यक्षाला पाहून अनेकांनी संघटनेसाठी वेळ दिला अन छोट्याश्या रोपट्याचा अल्पावधीत वटवृक्ष झाला ! संघटना राज्यपातळीवर वाढत होतीच. राज्याध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष यांच्या संपर्कात राहून राज्यभर जिथे आंदोलन असतील त्यात सहभाग घेत मुंबई व संपूर्ण राज्यासाठी तो एकप्रकारे 'प्रेरणास्रोत' बनला !
 
अनेक आंदोलनातून आपली छाप सोडत त्याने आपण अपंग असतांना इतक्या प्रचंड ऊर्जेने काम करतो हे सिद्ध केल्याने संघटनेतील सर्वच तरुण तडफदार कार्यकर्ते जोमाने उठले अन संघटनेचा आवाज बुलंद झाला. इतका बुलंद की मंत्रालयाच्या खिडक्यांची तावदाने फुटून संघटनेचा आवाज मुख्यमंत्री ते कक्षअधिकारी यांच्या कानी गेला अन त्यांना संघटनेची दखल घेण्यास भाग पाडू लागला !
 
आपण लावलेल्या रोपचा वटवृक्ष झालाय...संघटनेचा व्याप वाढलाय. संघटनेत अनेक कार्यकुशल साथीदार आज आपल्या सोबत आहेत, आपण शाखा स्थापन केली म्हणून जिल्हाध्यक्ष पदावर किती दिवस तहान मांडून बसायचे? आपल्यापेक्षा उत्कृष्ट काम करणारे कोणी असतील तर त्याला पण संधी देणे आपले ज्येष्ठ या नात्याने कर्तव्यच आहे ! या भावनेतून त्याने जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला ......!
 
नवीन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी परीक्षक म्हणून आलेल्या प्रवीण बडे अन अमोल माने यांच्या उपस्थितीत झालेल्या नवीन जिल्हाध्यक्ष निवडीत सर्वानुमते तानाजीचा 'मुंबईचा जिल्हाध्यक्ष' या पदावर पुन्हा एकदा बिनविरोध फेरनिवड करण्यात आली !! आज तो अभिमानाने 'जुनी पेंशन हक्क संघटनेचे' काम करतोय !! ही विजयश्री होती त्याच्या जिद्दीची, चिकाटीची, सचोटीची, कार्यतत्परतेची, समंजसपणाची, अपंगत्वावर मात केल्याची अन आईच्या आशीर्वादाची !!!
 
शिक्षणमंत्री किंवा सचिवापासून ते कक्षाधिकारी यांना आज तानाजीची दखल घ्यावी लागते ! दस्तुरखुद्द शिक्षणमंत्री वेळ देऊ शकले नाही तर त्याच्याशी फोनवर संवाद साधून त्याला फोन करून बोलवून त्याच्याशी संघटनेच्या मागण्यांवर चर्चा करतात ! ही सर्व शिक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे !!
 
'बापमाणुस' धनाजी कांबळे आज लातूरमध्ये दोन प्रशस्त संगणक क्लास चालवतोय..! ताई-दाजी आपल्या दोन चिमुकल्यांबरोबर आनंदाने संसार करताहेत ! 
 
पण तानाजी खचला असता तर.…..?? कदाचित असाच कुठेतरी हात पसरतांना दिसला असता पण 'शारीरिक अपंगत्व' जरी त्याला प्रारब्धाने भेटले असले तरी तो "मानसिक अपंग" बनला नाही !!
 
उलट सर्वांसमोर आदर्श निर्माण करून समाजातील मानसिक अपंगांना चपराक देऊन जगण्याचा दृष्टिकोन दिला !! आज आपल्या 'अधू' पायांवर तो संघटनेच्या कामासाठी धावतोय ! नव्हे पळतोय !! अन तो पळतोय म्हणून घरात बसलेल्या 'धडधाकट' 'मानसिक अपंगांना' चपराक बसल्याने ते सुद्धा स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याच्याबरोबर धावताहेत अन संघटन वाढतेय !
 
एक ना एक दिवस हे सर्व शिलेदार आपल्या पदरात 'जुनी पेंशन' पाडुनच स्वस्थ बसणार हे मात्र निश्चित !!
 
सलाम 'तानाजी राजाबाई कांबळे' !!  सलाम 'जुनी पेंशन हक्क संघटन' ....!!!

शरदचंद्र शहापुरकर
8484031111

Rating Star

0 comment

Leave a comment


Related news

side-banner
side-banner

RECENT COMMENTS